Jump to content

दिवाकर कृष्ण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
दिवाकर कृष्ण

दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण (जन्म : गुंटकल, १९ ऑक्टोबर, १९०२; - ३१ मे, १९७३) हे मराठी लेखक होते. ते हैदराबादमध्ये वकिलीचा व्यवसाय करीत. १९२२पासून दिवाकरांनी मनोरंजन मासिकातून कथालेखन केले.

दिवाकर कृष्ण केळकर हे गुलबर्गा जिल्ह्यातील गुंटकल (गुनमटकल) येथे जन्मले. मुंबई, पुणे आणि सांगली येथे राहून एम.ए. एल्एल.बी. झाल्यानंतर ते हैदराबाद येथे वकिलीचा व्यवसाय करू लागले. १९२२ मध्ये मासिक मनोरंजनाच्या एका अंकातून 'अंगणातला पोपट' ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह समाधी व इतर सहा गोष्टी ह्या नावाने प्रसिद्ध झाला (१९२७). त्यानंतर रूपगर्विता आणि इतर गोष्टी हा कथासंग्रह प्रकाशित झाला.

सन्मान

दिवाकर कृष्ण यांच्या जीवनावर आणि साहित्यावर डॉ. अनिता वाळके यांनी ’कथाकार दिवाकर कृष्ण’ हा समीक्षाग्रंथ लिहिला आहे. हा त्यांच्या पीएच.डी.चा संशोधन विषय होता. प्रस्तुत ग्रंथ हा दिवाकर कृष्ण यांच्या कथा वाड्मयाची चिकित्सा करणारा ग्रंथ आहे. हा ग्रंथ एकूण सात प्रकरणात विभागला आहे. त्यात दिवाकर कृष्णपूर्व मराठी लघुकथा, भाषांतरित व अनुवादित कथा, दिवाकर कृष्ण केळकर यांचा चरित्रपट, कथाकार दिवाकर कृष्ण, दिवाकर कृष्णोत्तर कथा, दिवाकर कृष्ण केळकर यांच्या कथेचा आढावा व शेवटी संदर्भ ग्रंथसूची दिलेली आहे.

महाराष्ट्र सरकार त्यांच्या नावाचा 'दिवाकर कृष्ण लघुकथा पुरस्कार' देते. हा पुरस्कार मिळालेले लेखकव त्यांच्या कृती :
१.. मधुकर धर्मापुरीकर यांना 'झाली लिहून कथा' या कथासंग्रहासाठी.
२. जयसिंगपूर येथील लेखिका नीलम माणगावे यांच्या 'निर्भया लढते आहे' या कथासंग्रहाला
३. विनीता ऐनापुरे यांना 'कथा तिच्या' या कथासंग्रहासाठी.
४. लेखिका मोनिका गजेंद्रगडकर यांना शिल्प' या कथासंग्रहासाठी
५. लेखिका नीरजा 'पावसात सूर्य शोधणारी माणसं' या पुस्तकासाठी.

दिवाकर कृष्ण यांचे प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
किशोरीचे हृदय कादंबरी
महाराणी व इतर कथा कथा संग्रह 1955
रूपगर्विता आणि इतर गोष्टी कथा संग्रह 1941
विद्या आणि वारुणी कादंबरी
समाधी आणि इतर सहा गोष्टी कथा संग्रह देशमुख आणि कंपनी प्रकाशन १९२७