उपयोजित यामिकी
उपयोजित यामिकी ही पदार्थविज्ञानाची एक शाखा असून त्यात यामिकीच्या व्यवहारातील उपयोगाचा अभ्यास केला जातो. उपयोजित यामिकीमध्ये स्थायू तसेच द्रव पदार्थ किंवा संस्था या बाहेरून लावल्या गेलेल्या बळाला कसा प्रतिसाद देतात याचे विवेचन आहे. उदाहरणार्थ या ज्ञानशाखेमध्ये दडपणाखाली असलेल्या द्रवाचे वहन कसे होते, बाहेरून लावलेल्या बळामुळे पदार्थ कसे भंग पावतात, किंवा बाहेरील आवाजामुळे कानाचा पडदा कसा कंप पावतो यासारख्या घटनांचा अभ्यास केला जातो.
अभियांत्रिकीतील यामिकीच्या अभ्यासात मुळात स्थिर असणाऱ्या वा गतिमान असणाऱ्या वस्तूवर विविध बळांचा प्रयोग झाला असता तिच्या आचरणात होणाऱ्या बदलाचा अभ्यास केला जातो. पदार्थविज्ञानातील सिद्धांत व त्यांचा व्यवहारातील उपयोग यांतील दुवा सांधण्याचे काम उपयोजित यामिकी करते. या ज्ञानशाखेचा उपयोग अभियांत्रिकीच्या विविध क्षेत्रांत, त्यातही यांत्रिकी व स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये विशेष करून होतो. यामुळे या ज्ञानशाखेला अभियांत्रिक यामिकी असेही म्हणले जाते.आधुनिक अभियांत्रिक यामिकीची पाळेमुळे आपल्याला इसाक न्यूटने प्रतिपादित केलेल्या गतीनियमांपाशी गेलेली आढळतात तर या नियमांचा आधुनिक कालातील प्रयोग आपल्याला स्टीफन टिमोशेंकोने केलेला आढळतो, म्हणून त्याला आधुनिक अभियांत्रिक यामिकीचा जनक असे संबोधले जाते.
पदार्थविज्ञानाच्या संदर्भात बोलायचं झाल्यास उपयोजित यामिकीचा उपयोग नवीन कल्पना व सिद्धांतांची मांडणी करण्यात, विविध घटनांचा शोध घेऊन त्यांची कारणे जाणून घेण्यात व विविध प्रायोगिक तसेच गणना करण्यात उपयोगी पडणाऱ्या साधनांची निर्मिती करण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात होतो. भौतिकशास्त्रातील त्याच्या उपयोगासंबंधी विचार केल्यास यामिकीला पूरक म्हणून उष्मागतिकी (उष्णता किंवा ढोबळ मानाने ऊर्जेचा अभ्यास ) तसेच विद्युत्यामिकीचा (वीज आणि चुंबकत्त्वातील संबंधाचा अभ्यास) उपयोग होतो.